Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Monday, April 15, 2013

संत गाडगे महाराज

गाडगे महाराज


"देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे व गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज."

 गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.

पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना 'गोधडी महाराज', 'चिंधेबुवा', 'बट्टीसाधू' इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक 'गाडगे बाबा' म्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. " मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही " हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच 'लोकसंस्कारपीठ' बनविले होते.


सामाजिक सुधारणा

      १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे 'सर्व जनांनी' एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

     समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. ' देव दगडात नसून तो माणसांत आहे ' हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते " संत तुकाराम महाराजांना " आपले गुरू मानीत. 'मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही' असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. 'देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .' असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
    त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - 'या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली' - असे म्हटले जाते. 'महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ', असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.


  • गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
  • ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
  • १९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
  • १९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
  • १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
  • "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
  • फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
  • गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
  • १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
  • गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
  • "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
  • आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
  • १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
  • १९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
  • गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
  • डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
  • २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
  • गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
 1.  भुकेलेल्यांना अन्न
2.तहानलेल्यांना पाणी
3. उघड्यानागड्यांनावस्त्र
4.गरीब मुलामुलींना

शिक्षणासाठी मदत

5. बेघरांनाआसरा
6.अंध,पंगु,रोग् यांना औषधोपचार
7. बेकारांनारोजगार
8.पशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना

अभय

9. गरीब तरुण-तरुणींचे

लग्न

10.दु:खी व निराशांना हिंमत

हाच आजचा रोकडा धर्म आहे !  हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

 

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.